[मुद्दे : 'शाळा तुमच्या दारी प्रकल्पात' शिकवण्याचा आनंद मिळाला- गुरुऋण फेडणे - आपले शिक्षक- समाजातील इतर थोर शिक्षक यांच्या आठवणी- आदर्श शिक्षक होण्यासाठी विषयाचे ज्ञान, शिकवण्याचे कसब विषयात रस - विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचे यत्न. ]

आम्ही दहावीत आलो तेव्हा आमच्या शाळेने एका प्रकल्पात भाग घेतला होता. प्रकल्प एका संस्थेने सुरू केला होता. 'शाळा तुमच्या दारी.' आदिवासी वस्तीत जाऊन तेथील मुलांना शिकवायचे. आम्हीपण आमच्या सरांबरोबर आठ दिवस तेथे गेलो होतो. त्या मुलांना शिकवताना मला खूप गंमत वाटली. मी त्यांना काही कविता शिकवल्या आणि नंतर कातरकाम करून कागदांतून काही आकृती बनवायला (ओरीगामी) शिकवल्या. प्रथम थोडा वेळ लागला; पण नंतर त्यांना भराभरा जमू लागले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अवर्णनीय होता. तेव्हाच माझ्या मनाने निर्णय घेतला की, आपण शिक्षक व्हायचे !

आपल्या संस्कृतीत तीन प्रकारची ऋणे सांगितली आहेत. त्यांपैकी एक आहे. 'ऋषिऋण' म्हणजे गुरूचे ऋण. गुरूचे ऋण कसे फेडायचे ? तर गुरूकडून आपल्याला जे काही ज्ञान मिळाले, विद्या मिळाली ती आपण दुसऱ्याला दयायची. मी शिक्षक झालो, तर मी माझ्या गुरुजींच्या ऋणांतून काही अंशांनी तरी मुक्त होऊ शकेन.

मी शिक्षक झालो तर...? याबाबत जेव्हा मी विचार करू लागतो, तेव्हा माझे अनेक शिक्षक माझ्या मनःचक्षूसमोर उभे राहतात. मला आठवतात माझ्या पूर्वप्राथमिक शाळेतील 'ताई' आमच्यासाठी त्या किती धडपडत असत. आम्हांला गाणी, गोष्टी शिकवत. आम्ही कितीही दंगा केला तरी त्या आमच्यावर कधी रागावत नसत. नंतर प्राथमिक व माध्यमिक शाळेत आमच्यासाठी कष्ट घेणारे शिक्षक आठवले. आमचे हस्ताक्षर चांगले व्हावे, आम्हांलावाचनाची गोडी लागावी, आमच्यात सभाधीटपणा यावा, म्हणून सतत धडपडणारे शिक्षक आठवले. इंग्रजी भाषेत आपण बिनचूक, अस्खलित बोलावे, म्हणून धडपडणारे सर, गणितात आम्ही प्रवीण व्हावे, म्हणून झटणारे गुरुजी डोळ्यासमोर आले. साने गुरुजी, लोकमान्य टिळक, प्राचार्य गोपाळराव आगरकर या आदर्श शिक्षकांविषयीच्या वाचलेल्या हकिकती। आठवल्या.

मी शिक्षक झालो तर आदर्श शिक्षक होण्याचाच यत्न करीन. त्यासाठी मी माझ्या विषयांत निपुण होईन. शिक्षक हा सदैव विदयार्थी असला पाहिजे. त्याने सदैव आपल्या विषयाचे अध्ययन केले पाहिजे. काही शिक्षक खूप हुशार असतात, तज्ज्ञ असतात. पण ते विद्यार्थ्या पर्यंत आपले ज्ञान नीट पोहोचवू शकत नाहीत. मी शिक्षक झालो, तर मी माझा विषय विदयार्थ्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवीन शिकणे आणि शिकवणे या दोन्ही गोष्टींत रस निर्माण झाला पाहिजे. आपला विषय विदयार्थ्यांना 'बोअर' होणार नाही याची शिक्षकाने काळजी घेतली पाहिजे. किंबहुना हसतखेळत अध्यापन हे कसब मी साध्य करून घेईन. वर्गातील हुशार विदयार्थ्याला जेवढी गोडी वाटेल, तेवढीच गोडी वर्गातील सुमार विदयार्थ्याला वाटली पाहिजे, तरच मी यशस्वी शिक्षक ठरेन, मला केवळ विषय शिकवायचा नाही, तर माझ्यासमोरच्या विदयार्थ्याचे व्यक्तिमत्त्व मला घडवायचे असेल. तेच माझे ध्येय असेल.