माझे आवडते शिक्षक
[ मुददे : माझे आवडते शिक्षक कोण? - सर्व विद्यार्थ्याचे आदरणीय स्थान- सर्व विदयार्थ्याचे एकमत -व्यक्तिमत्य वर्णन- वेशभूषा- विद्यार्थ्यांसाठी धडपड -गुरुजींचे विषय- विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त ज्ञान देण्याची धडपड- उपक्रमशील- आम्ही भाग्यवान विद्यार्थी....]
आवडते शिक्षक म्हणताच मला आठवतात ते आमचे जाधव सर. जाधव सर हेच आमचे आवडते शिक्षक आहेत. केवळ आवडतेच नव्हेत तर प्रातःस्मरणीय आणि वंदनीय आहेत.
केवळ माझेच नव्हे; तर आमच्या गावातील या शाळेत जे जे विदयार्थी शिकून गेले त्या सर्वांचे आवडते शिक्षक म्हणजे जाधव सर किंबहुना या शाळेतील विद्यार्थी कोठेही, एकमेकांना भेटले की, ते जाधव सरांच्या हटकून आठवणी काढतात.
जाधव सरांचे व्यक्तिमत्व रुबाबदार आहे. उंच शरीरयष्टी, गव्हाळ वर्ण आणि प्रसन्न चेहरा. सरांचा पोशाख अगदी साधा, पण स्वच्छ. कधी कधी ते खादीचा लांब सदरा घालतात; तेव्हा तर ते एकदम रुबाबदार दिसतात. त्यांनी कधी भडक रंगाचे कपडे घातलेले मला आठवतच नाही.
सिनेमातल्या ढंगाचे फॅशनेबल कपडे त्यांच्या अंगावर कधी दिसले नाहीत. या स्वच्छ व साध्या पोशाखावरूनही पाहणाऱ्याला सरांच्या स्वच्छ व निर्मळ अंतःकरणाची आणि निष्कलंक चारित्र्याची लगेच साक्ष पटावी.
जाधव सर आम्हांला विज्ञान व गणित विषय शिकवतात. या विषयांत त्यांचा हातखंडाच होता. विज्ञान विषय कठीण व कंटाळवाणा आणि गणित तर भीतिदायक ! पण जाधव सरांचे कौशल्य असे की, हे विषय आम्हांला कधी कंटाळवाणे वाटले नाहीत वा त्यांची भीतीही वाटली नाही.
घरगुती प्रसंगांतील उदाहरणे घेत घेत ते सहज अभ्यासाकडे वळत. एकदा विज्ञानाच्या तासिकेच्या वेळी ते ' दही लावण्या चे प्रकार सांगू लागले. दही आंबट न होता ते मधुर व मलईसारखे होण्यासाठी विरजण कसे लावतात, हे सांगता सांगता बॅक्टेरिया म्हणजे काय, त्यांचे स्वरूप कसे असते, त्यांचे प्रकार किती वगैरे पाठ्यपुस्तकातील माहितीकडे केव्हा वळले, कळलेच नाही.
एकदा घरातील फ्युज गेल्यावर त्यांना वितळतार मिळेना, तेव्हा वायरमधील साधी तार लावून वीजप्रवाह कसा सुरू केला, हे त्यांनी आम्हांला वर्गात सांगितले. पण त्यानंतर लागलीच धावतपळत जाऊन वितळवार आणली आणि साध्या तारेच्या जागी तो बसवली. हे आपण का केले, नाही तर कोणता धोका होता, हे समजावून सांगता सांगता त्यांनी विजेचे वहन, त्याचे परिणाम इत्यादी बाबी अलगद आमच्या डोक्यात घातल्या.
अनेकदा ते शास्त्रज्ञांच्या आयुष्यातले धडपडीचे प्रसंग रंगवून सांगत आणि त्यायोगे अनेक सिद्धांत गप्पांच्या स्वरूपात शिकवत. जाधव सर गणितातील अनेक प्रमेये शिकवताना गणितज्ञांच्या रंजक आठवणी सांगत. त्यामुळे प्रमेये आम्हांला कधी किचकट वाटलीच नाहीत.
विज्ञानप्रदर्शन हा तर जाधव सरांचा जिव्हाळ्याचा विषय. आम्हा विद्यार्थ्यांचे गट करून ते सगळ्यांना प्रदर्शनात भाग घ्यायला लावत. आम्हांला ते विषय नेमून देत. आम्हांला विचार करायला लावत, उपक्रम शोधायला लावत. या प्रयत्नांत त्यांचे मार्गदर्शनही असे. त्यामुळे आम्ही मोठ्या शास्त्रज्ञांच्या ऐटीत विज्ञानातील उपक्रम सादर करत असू.
आता दहावीचे वर्ष संपत आले आहे. माझ्या मनात सारखे येत आहे को. विज्ञान-गणिताची गोडी लावणारे जाधव सरांसारखे शिक्षक यानंतर मला भेटतील का ? माहीत नाही. मात्र मला मनापासून वाटते की, यापुढे कदाचित असे सर मिळतील, न मिळतील, पण जाधव सर आम्हांला मिळाले, हे आमचे केवढे भाग्य।
0 टिप्पण्या