[ मुद्दे : खेळाचे जीवनातील अनन्यसाधारण स्थान- खेळांचे उपयोग- नेतृत्वगुण, सांघिक भावना, ऐक्य - जबाबदारीची जाणीव निकोप -दृष्टिकोन - दुसऱ्यांविषयी आपुलकी- वेळेचे महत्त्व - शिस्तप्रियता, चपळता, काटकपणा - सध्याबहुतेकांची आवड क्रिकेट- खेळाचा तपशील व महत्त्व...]
आज एकविसाव्या शतकात माणसाला खेळाचे महत्त्व उमगलेले आहे. शरीर निरोगी राहण्याकरिता व्यायाम, योग वा खेळ आवश्यक आहेत हे सर्वमान्य झाले आहे. आज भारतात क्रिकेट हा अत्यंत लोकप्रिय खेळ ठरला आहे. त्यामुळे साहजिकच क्रिकेट खेळणाऱ्यांपेक्षा
क्रिकेट पाहणारे व ऐकणारे यांचीच संख्या फार मोठी झाली आहे. मी त्यांपैकीच एक. मी क्रिकेट खेळतो, क्रिकेटसंबंधित पुस्तके वाचतो आणि मैदानावर जाऊन वा न जमल्यास दूरचित्रवाणीवर क्रिकेटचे सामने पाहतो. असे सामने पाहताना सर्व क्रिकेटप्रेमी देहभान हरपून जातात.
क्रिकेटवर अलीकडे खूप टीका होत आहे. ती रास्तच आहे. हा खेळ चार-चार, पाच-पाच दिवस चालतो. क्रिकेटचे सामने असले की लोकांमध्ये अक्षरशः वारे संचारते. लोक कामधाम सोडून हा खेळ पाहत बसतात. त्यामुळे देशभर कामाचे लक्षावधी तास फुकट जातात. कामावर हजर असलेले लोक एकाग्र चित्ताने कामे करत नाहीत. विदयार्थ्यांचे तर अभ्यासाकडेही दुर्लक्ष होते. देशाच्या कार्यशक्तीची ही फार मोठी हानी आहे, यात शंकाच नाही.
आपले क्रिकेटपटू खेळापेक्षा पैशाकडे लक्ष देतात. आपण देशाच्या वतीने खेळत आहोत, ही भावनाच लुप्त होत आहे. अलीकडे तर आपल्या खेळाडूंचा कोटी कोटी रुपयांना . लिलाव होऊ लागला आहे. वारेमाप प्रसिद्धी व वारेमाप पैसा यांमुळे या खेळांच्या सामन्यात विकृत प्रवृत्ती शिरल्या आहेत. या खेळाकडे कोणीही खेळ म्हणून पाहतच नाही. खिलाडूवृत्ती नष्ट होत आहे. इतर खेळांना काडीचीही किंमत कोणी देताना दिसत नाही.
असे असले तरी हा खेळ मला खूप आवडतो. या खेळाचे काही फायदेही आहेत. या न खेळामुळे चपळता, काटकपणा व शिस्तप्रियता या गुणांचा विकास होतो. या खेळात फलंदाजी, न गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्व बाबतीत आपले नैपुण्य दाखवता येते. चौकार-षट्कार मारणाऱ्या, अवघड झेल पकडणाऱ्या खेळाडूला प्रेक्षक डोक्यावर घेतात. क्षणाक्षणाला चुरस वाढवणारा असा हा खेळ आहे.
अलीकडे क्रिकेटचे स्वरूप बदलत आहे. सध्या कसोटी सामन्यांबरोबर एकदिवसीय सामनेही खेळले जातात. वीस-वीस षटकांचे सामनेही लोकप्रिय झाले आहेत; कारण त्यांचा निकाल झटपट लागतो. आपल्या देशात अनेक उत्कृष्ट क्रिकेटवीर होऊन गेले व आजही आहेत. त्यांनी जागतिक कीर्ती मिळवली. आज सचिन तेंडुलकर हा सर्वांचा आवडता खेळाडू आहे.
क्रिकेटमध्ये वैयक्तिक विक्रमांची नोंद ठेवली जात असली तरी या खेळात सांघिक एकता हीच महत्त्वाची आहे. तीच यश खेचून आणते. काही वेळेला एखाद्या खेळाडूने भरपूर धावा केल्या तरी संघाला यश मिळत नाही. 'क्रिकेट हा योगायोगाचा खेळ आहे'. प्रत्येक डावात काय घडेल, हे सांगणे कठीण असते. प्रत्येक खेळाडूला अतिशय जबाबदारीने खेळावे लागते; कारण त्यावरच त्याच्या संघाचा आणि पर्यायाने देशाचा लौकिक अवलंबून असतो.
0 टिप्पण्या